|
|

आत्मतेजाचा साक्षात्कार मंगळवार, ९ मार्च, २०१०
भारतीय संस्कृतीत दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या त्रिशक्तीला मानाचे स्थान आहे. शक्ती देऊन संरक्षण करणारी दुर्गा, सुखसमृध्दी देणारी लक्ष्मी आणि बुध्दीवैभव देणारी सरस्वती या अनादि काळापासून पूजल्या जातात. भारतीय संस्कृतीचे गुणगान करीत असतांना दुसरीकडे या त्रिशक्तीचे रूप असणार्या स्त्रिला हिनतेची वागणूक दिल्याची उदाहरणे दिसून येतात. या स्त्रियांमधील अदृश्य शक्ती पुन्हा प्रकट व्हावी, तिच्यात आत्मसन्मानाची ज्योत पेटावी म्हणून जगभरात ८ मार्च हा 'महिला दिन' म्हणून साजरा केला जातो. महिलांमध्ये निर्माण झालेल्या आत्मतेजाचा साक्षात्कार प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मला घोडेगाव (ता. आंबेगाव) या आदिवासी गावात मिळाली.
भारतीय स्टेट बँक आणि ज्ञानशक्ती विकास वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला बचतगट मेळावा आयोजित करण्यात आला होता. 'महान्यूज' या आपल्या वेबपोर्टलसाठी यशकथांच्या निमित्ताने या बचतगटांच्या महिलांशी अनेक वेळा संपर्क आला होता. तथापि सर्वांना एकत्रित भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची ही सुवर्णसंधी होती.
कार्यक्रम आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या घोडेगावमध्ये होता. शहरी भागातील कार्यकमांना जिल्हा माहिती अधिकारी या नात्याने प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष म्हणून बोलवले जाते. मात्र आदिवासी भागातील भगिनींचा तेजोमय साक्षात्कार पहाण्याचे ठरवले. त्यानुसार सकाळी ७ वाजताच प्रमुख कॅमेरामन जयसिंग जाधव, सहायक संजय गायकवाडसह शासकीय वाहनातून निघालो. भगिनींना 'लोकराज्य' मासिकांविषयीही माहिती व्हावी म्हणून दूरमुद्रक चालक एस. एफ. पठाण यांनाही बरोबर घेतले.
सकाळी ९.०० च्या सुमारास कार्यक्रमस्थळी पोहोचलो. चहा आणि नाश्ता झाल्यावर महिलांची वृक्षदिंडी आणि शिवारफेरी निघाली. या वृक्षदिंडीचा शुभारंभ मीनल पाटील आणि सुरेखा खिलारी यांनी केला. अग्रभागी डिजीटल साउंड सिस्टीम, झांज पथक त्यानंतर राणी सईबाई आणि राणी लक्ष्मीबाई तर बैलगाडीत राजमाता जिजाऊ, बाल शिवराय, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत मिराबाई, मदर तेरेसा आणि किरण बेदी यांची वेशभूषा केलेल्या मुली, महिला या शिवारफेरीचे प्रमुख आकर्षण होत्या.
घोडेगाव शहरातील हरिश्चंद्र मंदिर, पंचायत समिती, चावडी चौक या मार्गाने ही दिंडी निघाली. सुमारे तीन हजार महिला या वृक्षदिंडीमध्ये सहभागी झालेल्या होत्या. महिलांच्या हातातील फलक सुध्दा लक्षवेधक होते. 'एक दोन तीन चार, अंधश्रध्देला घालवू हद्दपार,' 'झाडे लावा खूप खूप, मातीची थांबेल धूप धूप' , 'एक तरी झाड लावू या, एक तरी झाड जगवू या', 'जादू टोणा भानामती, या तर चमत्काराच्या करामती,' 'लावू नका वणवा, वन्यजीव वाचवा', 'ऋषी, भगत बाबा अन् बापू सगळेच आहेत खिसेकापू', 'अंधश्रध्देचा भस्मासूर, नष्ट करा नष्ट करा'अशा घोषणा लिहीलेले फलक विद्यार्थीनी तसेच महिलांनी हाती धरलेले होते. साउंड सिस्टीम वरील वेगवेगळी देशभक्तीपर गीते ऐकून अंगावर रोमांच उभे राहत होते. महिलांचे दांडीया नृत्य आणि विद्यार्थिनींचे लेझीम नृत्य वातावरणात चैतन्य निर्माण करत होते. पर्यावरण, वृक्षारोपण, निर्मलग्राम अशा विविध प्रश्नाबाबत जनजागृतीच्या घोषणाही यावेळी दिल्या जात होत्या.
वृक्ष दिडींच्या समारोप वनमाला मंगल कार्यालयात झाला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरूण गिरे, भारतीय स्टेट बँकेचे प्रमुख व्यवस्थापक विद्याधर बिरजे आदी उपस्थित होते. अध्यक्ष श्री. वळसे-पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना कुपोषण निर्मूलन, बालविवाह बंदी, हुंडा प्रतिबंधक चळवळ, आरोग्य जागृती, आर्थिक सक्षमता अशा मुद्दयांचा उहापोह केला. चूल आणि मूल हे महिलांचे कार्यक्षेत्र राहिलेले नाही, त्यांच्या कर्तृत्वाचे क्षितीज विस्तारले आहे. महिलांना बालविवाहासारख्या घटना रोखण्यासाठी पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले. संसदेत मांडल्या जाणार्या महिला आरक्षण धोरणाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
श्री. वळसे-पाटील यांच्या हस्ते आदर्श महिला संघटक, आदर्श बचतगट आणि ज्ञानशक्ती युवा उद्योजकता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यानंतर भोजनाची व्यवस्था होती.
भोजनानंतर संगीत खुर्ची, चमचा लिंबू, उखाणे, प्रश्नमंजुषा असे क्रिडा प्रकार झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनातील प्रसंग सादर करून सर्वांनाच गंभीर करून टाकले.
या सर्व कार्यक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन महिलांनीच केले होते. प्रमुख पाहुण्याचा सत्कार असो की, सूत्रसंचालन हे महिला भगीनीच करत होत्या. इतका भरगच्च कार्यक्रम असतांना कुठेही ढिसाळपणा आढळला नाही. स्त्रियांमध्ये असलेल्या आत्मभावाचे, प्रतिष्ठेचे, सन्मानाचे प्रत्यंतर ठायी ठायी जाणवत होते.
राजेंद्र सरग
'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
|
|